थेऊरचा महिमा

थेऊरचे माहात्म्य

या क्षेत्रास स्थावरक्षेत्र किंवा थेऊर म्हणतात. याचे वर्णन मुद्‍गलपुराणात व श्रीगणेशपुराणात आहे. द्वापार युगात तृतीय चरणात विष्णू-लक्ष्मीच्या पोटी (माधव व सुमेधा) श्रीचिंतामणीचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने चित्त स्थिर करण्यासाठी इथे तप:श्चर्या केली. ब्रह्मदेवाच्या मनाला स्थिरता मिळाल्याने या क्षेत्राला स्थावरक्षेत्र असे नाव पडले. ’स्थावर’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन थेऊर हे नाव प्रचलीत झाले. अष्टविनायकांपैकी हे एक महत्वाचे स्थान आहे.

या क्षेत्राचा स्वामी श्रीचिंतामणी आहे. भाविकांच्या मनातील चिंता दूर करण्याचे सामर्थ्य या क्षेत्रामध्ये आहे. म्हणून श्रीचिंतामणी हे नाव पडले. श्रीचिंतामणीची मूर्ती स्वयंभू आहे. जगातील सर्व तीर्थ अंशरूपाने या क्षेत्रात वास करतात. इथे अनुष्ठान केल्यास प्रत्यक्ष श्रीचिंतामणी प्रसन्न होतात. या गणेशतीर्थाच्या दर्शनाने सद्‍गती मिळते. स्पर्शाने सायुज्यता प्राप्त होते. श्रीगणेशाचे चरणतीर्थ घेतल्याने सर्व पातकांचा नाश होतो. पुनर्जन्म मिळत नाही. प्रत्यक्ष शिवानेही या क्षेत्रात तप केले आहे. गाणपत्य या क्षेत्राला प्रयागासमान मानतात.श्रीचिंतामणीची मूर्ती बाल स्वरूप असून मातृ स्वरूप जागृत देवस्थान असल्याने या ठिकाणी मातृश्राद्ध केल्यास मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. ही मातृगया आहे. व मोरगाव पितृगया आहे. या गणेशकुंडावर जर पिंडश्राद्ध केले तर मनुष्य मातृऋणातून मुक्‍त होतो. असा थेऊर क्षेत्राचा महिमा अगाध आहे.

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावींची तपश्‍चर्या:

मोरया गोसावींचे गुरू श्रीनयनभारतींनी आज्ञा केल्या प्रमाणे श्रीमोरया गोसावींनी थेऊर इथे तपश्चर्या केली. बेचाळीस दिवसांच्या समाधीनंतर त्यांना थेऊर क्षेत्राची अधिष्ठात्री देवता ’श्रीचिंतामणी’ प्रसन्न झाली. त्यांनी श्रीमोरया गोसावींना प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यांना समाधीतून जागे करून ते म्हणाले, "तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. तुझ्या तपाचे फळ म्हणून मी स्वेच्छेने तुझ्या पोटी जन्म घेईन. तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर."

श्रीमोरया गोसावींच्या पोटी श्रीचिंतामणींनी जन्म घेतला. जन्मल्या जन्मल्या चिंतामणी रडला नाही. त्याने खेचरी मुद्रा धारण केली होती. त्यांच्या छातीवर शेंदराचा पंजा उमटला होता. त्यांनी जिथे तप केले ती जागा आजही ’मोरयाचे आसन’ म्हणून प्रसिद्ध आहे. तपश्चर्येच्या काळात कसोटीचा एक क्षण आला. जंगलातून एक वाघ आला. श्रीमोरया गोसावींना पाहून खाण्याकरता वाघाने त्यांच्यावर झडप घातली. झडप घालण्यापूर्वी त्याने भयंकर गर्जना केली. त्याच्या आवाजाने श्रीमोरया गोसावींनी किंचित्‌ डोळे उघडून वाघाकडे पाहिले. वाघाने झडप घातली पण तो श्रीमोरयांच्या स्पर्शाने शिळारूप झाला. अजूनही पाषाण झालेला वाघ थेऊरला पहायला मिळतो. त्या ठिकाणी एक घुमटी बांधण्यात आली आहे.

थोरले माधवराव पेशवे आणि सतीचे वृंदावन:

थोरले माधवराव पेशवे हे श्रीचिंतामणींचे अनन्य भक्‍त होते. त्यांनी आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस श्रीचिंतामणीच्या सान्निध्यात घालवले. दुखणे असाध्य झाल्यावर बरे वाटावे म्हणून श्रीचिंतामणीवर अखंड दुग्धधार धरली होती. त्यांनी श्रीचिंतामणी चरणी आपले प्राण सोडले. त्यांच्या पत्नी रमाबाई तिथेच पतीबरोबर सती गेल्या. त्या ठिकाणी सतीचे वृंदावन आहे. दरवर्षी कार्तिक वद्य अष्टमीस रमा-माधवांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो. रमाबाई पेशवे स्मारकाचा चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे.

स्थानमाहात्म्य सांगणाऱ्या पुराणातल्या कथा:

अभिजित्‌ व गुणवती या राजदांपत्याला गण नावाचा मुलगा झाला. तो प्रवृत्तीने दैत्यासारखा दुष्ट होता. एकदा तो कपिलमुनींकडे गेला. त्याच्या जवळ चिंतामणी रत्‍न होते. त्याच्या प्रभावाने त्यांनी गणाला उत्तम जेवण दिले. गणाला चिंतामणी रत्नाची हाव सुटली. कपिलमुनी नको म्हणत असता गणाने बलात्काराने ते रत्‍न हिसकावून घेतले. कपिलमुनींनी श्रीविनायकाची आराधना केली. श्रीविनायकाने युद्ध करून गणदैत्याचा संहार केला. व चिंतामणी रत्न कपिला मुनींना दिले. कपिल मुनींनी ते स्विकारले नाही. विनायकाने श्रीचिंतामणींचे रूप घेऊन तिथे कदंब वृक्षाखाली कायमचे वास्तव्य केले. ते ठिकाण म्हणजे थेऊर, कदंब तीर्थ.

गौतम ऋषींची पत्‍नी अहिल्या हिच्या बद्दल इंद्राच्या मनात अभिलाषा उत्पन्न झाली. मुनि स्नानाला गेल्यावर त्यांचे रूप घेऊन इंद्राने अहिल्येला भ्रष्ट केले. गौतममुनींनी शाप देऊन इंद्राच्या शरीरावर क्षते उत्पन्न केली. इंद्राने पाय धरले. मुनींनी सांगितल्या प्रमाणे त्याने श्रीचिंतामणीची तपश्चर्या केली. आणि शापातून स्वत:ची सुटका करून घेतली. ज्या ठिकाणी ही शापमुक्‍ती मिळाली, त्या ठिकाणी इंद्राने श्रीचिंतामणीची स्थापना केली. ते हे क्षेत्र थेऊर.