Jump to Navigation

पदांचा गाथा - वारां प्रमाणे धूपार्तिची सरणी

मंगळवार

॥ पद ५३ ॥

हें मन वेधेलें हो (अहो) मोरयाचे ध्यानीं ॥ आणिक नावडे ह्या मोरयवाचोनी ॥ कथा मोरयाची (अहो) सांग माझे कानीं ॥ नाही तर प्राण (जिवासी) होऊं पाहे हानी ॥ १ ॥ मज हसतिल हो (अहो) परि हासोत ॥ परि मज सांग त्या मोरयाची मात ॥ तेणें मनचे हो (अहो) पुरलें आरत ॥ नाहीतर (जिवासी) प्राणा होऊं पाहे घात ॥ २ ॥ या हो जनासि (अहो) काय मज कज ॥ दीननाथ कृपळु महराज ॥ एकदंत हो (अहो) सुंदर चतुर्भुज ॥ तोचि (हाचि) ह्रुदयीं आठवतो मज ॥ ३ ॥ त्रैलोकीं हो व्यापक गजानन ॥ अन्तर (बाह्य) लागले ह्या मोरयाचें ध्यान ॥ कांही केलिया हो (अहो) न पुरे तें मन ॥ वृथा कासया कराल समाधान ॥ ४ ॥ देह विनटला (अहो) मोरयाची सोय ॥ तयासि प्रतिकार न चले हो कांही ॥ मोरया गोसावी (अहो) एकरुप देहीं ॥ दीन रंक मी रुळे त्याचे पायीं ॥ ५ ॥
मंगळवार

॥ पद ५४ ॥

जय जय हो (अहों) जय गणनाथा ॥ तुजवीण कोण सोडविल एकदंता ॥ येई येई तू (अहो) येई गजानना ॥ उशीर न लावी तुज भाकितों करुणा॥ दुष्ट भोगाची काय सांगू गति ॥ भोग भोगितों सांगतों तुजप्रति ॥ १ ॥ प्रपंचे वेष्टिलें (अहो) कय म्यां करावें ॥ तुजविण म्यां कवणा सांगावे ॥ उपेक्ष माझी तूं (अहो) न करी उदार ॥ तुज विनवितो मी मोरेश्‍वरा ॥ २ ॥ जन्मोजन्मीच्या (अहो) होत्या पुण्यराशी ॥ तरी मी पावलो तुझिया चरणासी ॥ चरणी लाविले (अहो) देवाजी पूर्वीच ॥ आत कासया तूं चाळविसी मज ॥ ३ ॥ गर्भवास म्यां (अहो) सोसिले बहुत ॥ आतां तुझिया मी आहे निश्चित ॥ धांवण्या माझ्या तू उशिर न लावी ॥ तुजवीण काय मी देह हा न ठेवी ॥ ४ ॥ ऐसी विनती हो परिसे गणपती ॥ तुज म्हणतो राहे माझे चित्ती ॥ विनवी दास हो म्हणे चिंतामणी ॥ रात्रंदिवस मी तुझे चरणी ॥ ५ ॥

मंगळवार

॥ पद ५५ ॥

मन माझे वेधले गणराजी ॥ वृत्ति बैसली तुझे पायी ॥ ध्रु. ॥ अहो वृथा माया लावली हो कां मज बहु भारी ॥ मोहापासुनी सोडवावें अरे तुज म्हणे एकभावे ॥ मन माझे. ॥ १ ॥ अहो पुत्रदारा धनादिका ॥ चाड नाही जन लोका ॥ शरण कोणा जाऊं आणिका ॥ अरे तूं मजवरी करी कृपा रे ॥ मन माझे.॥ २ ॥ अहो पतितपावन नाम तुझे आहे रे त्रयलोकी ॥ ब्रीदावळी साच केली अरे मज थोर जोडी झाली ॥ मन माझे ॥ ३ ॥ अहो भ्रमर मन आहे हो लुब्ध तुझें पायी ॥ सुगंधित वास आला आयागमन खुंटलें रे ॥ मन माझें. ॥ ४ ॥ अहो दास तुझा विनवितो चिंतामणि देव ॥ दीनरंका तारी वेग त्यासी लावी मुक्तिमार्गी ॥ मन माझे. ॥ ५ ॥

मंगळवार

॥ पद ३३ ॥

मोरया मोरया हो मोरया मोरया मोरया मोरया । मोरया मोरया हो मोरया हो ॥ माझे मोरया मोरया हो मोरया हो ॥ दैव केले डोळा हो पुण्य केले पायी ॥ माझ्या मोरयसि बाही हो आलिंगीन ॥१॥ अहो देवाचिया नरा हो बुद्धि केली लाटी ॥ माझ्या मोरयासि दृष्टी हो देखिलिया ॥२॥ अहो सेंदुर वर्णिला हो जयाच्या रे माथा ॥ अहो तया गणनाथा हो नमन माझे ॥३॥ अहो भागलों कष्टलों हो आलों मोरेश्वरा अहो आलों मोरेश्वरा ॥ त्याचे घरी डेरा हो अमृताचा ॥४॥ अहो भादवे चौथिसी हो जे द्वारे करीती ॥ अहो ते फळ पावती हो अभिलाषीचे ॥५॥ अहो मायबापाहुनी हो मोरया आगळा ॥ अहो न करी वेगळा हो जीवाहुनि ॥६॥ अहो मायबापाहुनि मोरया परी हे ॥ (लिंब) लोण मी घडिये हो उतरीन ॥७॥ अहो कऱ्हेच्या पाठारी हो नांदे इच्छादानी ॥ अहो नाम चिंतामणी हो मोरेश्वर ॥८॥ मोरेश्वर देव हो कमंडलू गंगा ब्रह्मकमंडलू गंगा ॥ अहो पापे जाति भंगा हो देखलिया ॥९॥ अहो कनकाचा परियेळु हो उजळू दीपका ॥ भावे (जिवे) ओवाळू नायका हो मोरेश्वरा ॥१०॥अहो शंख भेरी तुरे हो वाजती काहाळा ॥ (माझ्या) होतसे सोहळा हो मोरयाचा ॥११॥ अहो हाती पंचारती हो हरिदास नाचती ॥ अहो भावें (जिवे) ओवाळिती हो मोरेश्वरा ॥१२॥ अहो दुरूनि दिसती हो पांढरीया ध्वजा ॥ अहो तेथे नांदे राजा हो मोरेश्वर ॥१३॥ अहो यादवांचा हिरा हो आला माझे घरा ॥ (नव) रत्नांचा डोलारा हो लांबविला ॥१४॥

(चिंचवडच्या तिसऱ्या द्वारयात्रेतून परतताना आणि गोकुळाष्टमीला य पदाने सुरवात करावी.)

मंगळवार

आरती १

श्री गणेशाय नम: ॥ श्रीमोरया आदि अवतार तुझा अकळू कऱ्हे पाठारीं ब्रह्मकमंडलु गंगा ॥ रहिवास तये तीरी ॥ स्नान पै केलिया हो ॥ पापताप निवारी मोरया- दर्शन ॥ देवा मोरया- दर्शन ॥ जन्म मरण पै दूरी जयदेवा मोरेश्वरा ॥१॥ जय मंगलमूर्ती आरती चरणकमळा ॥ ओवाळू प्राणज्योति जयदेवा मोरेश्वरा ॥ ध्रु० ॥ अहो सुंदर मस्तकीं हो ॥ मुकुट दिसे साजिरा विशाळ कर्णव्दये ॥ कुंडले मनोहर त्रिपुंड्र टिळक भाळीं ॥ अक्षता तेजस्वर प्रसन्न मुखकमल ॥ देवा प्रसन्न मुखकमल ॥ मस्तकीं दूर्वांकुर जयदेवा मोरेश्‍वरा ॥ जय मं० ॥२॥ अहो नयने निर्मळ हो ॥ अति भोवया सुरेख एकदंत शोभताहे ॥ जडिली रत्‍नें माणिक बरवी सोंड सरळ ॥ दिसती अलौकिक तांबुल शोभे मुखी ॥ देवा तांबुल शोभे मुखी ॥ अधर रंग सुरेख जयदेवा मोरेश्‍वरा जय मं ० ॥३॥ चतुर्भुजमंडित हो शोभती आयुधें करीं ॥ परशु कमळ अंकुश हो मोदक पात्रभरी ॥ अमृत फळ नागर सोंड शोभे तयावरी ॥ मूषक वाहन तुझे ॥ देवा मूषक वाहन तुझे ॥ लाडू भक्षण करी ॥ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं० ॥४॥ नवरत्‍न कठीं माळ ॥ यज्ञोपवीत सोज्वळ ताइत मिरवतसे ॥ तेज ढाळ निर्मळ जाई जुई नाग चाफे ॥ पुष्पहार परिमळ चंदन कस्तुरी हो ॥ देवा चंदन कस्तुरी हो ॥ उटी घेऊन परिमळ ॥ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं० ॥५॥ अहो प्रसन्न दिसे दोंद ॥ तयावरी नागबंध सर्वांगि सेंदुर हो ॥ वरि मिरवे सुगंध नाभिमंडळ सुरेख ॥ विद्दा करिती आनंद कटिसूत्र शोभताहे ॥ देवा कटिसूत्र शोभताहे ॥ मेखळा कटिबंध ॥ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं ० ॥६॥ सुकुमार जानु जंघा पवित्र चरण- कमळ वर्तुळाकार घोटी ॥ टाचा दिसे सोज्वळ पाउले काय १ वर्णू ॥ अंगुलिका सरळ नखि चंद्र मिरवतसे ॥ देवा नखि चंद्र मिरवतसे ॥ भ्रमर घेती परिमळ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं० ॥७॥ अहो चरणी तोडर वाकि ॥ अदुंनाद साजिरा रत्‍नसिंहासनि हो ॥ ओवाळू विघ्नहरा देईल भुक्ति मुक्ति चुकतील येरझारा ॥ गोसावी दास तुझा ॥ मोरया गोसावी दास तुझा ॥ ओवाळू विघ्नहरा जयदेवा मोरेश्वरा ॥ जय मंगलमूर्तीआरती चरण-कमळा ॥ ओवाळूं प्राणज्योति जयदेवा मोरेश्‍वरा ॥८॥
१ कुंकुवर्णे

मंगळवार

॥ आरती ४ ॥

अहो अनुपम्य दिव्य शोभा रविकोटी भ्रूकुटी त्रिपुंड रेखियेला ॥ मृगनाभि लल्लाटी मुखप्रभा काय वर्णू ॥ दिव्य कंदपकोटी कुंडले रत्‍नदीप्ति देवा कुंडले रत्‍नदीप्ति ॥ पदक शोभे कंठीं ॥ जयदेवा धुंडिराजा१ ॥ जय मूष्कध्वजा आरती ओवाळिन ॥ अभय वरद सहजा ॥ जयदेवा धुंडिराजा ॥ ध्रु ॥१॥ अहो सुंदर मुक्तमाळा पुष्पहार रुळती आजानु बाहुदंड ॥ बहिवट शोभती डुलती चारी भुजा ॥ दशांगुले मिरवती आयुधें सहित देखा ॥ देवा आयुधे साहित देखा ॥ बाप मंगलमूर्ति ॥ जयदेवा धु. ॥२॥ अहो स्थूल हे दोंद तुझे वरी उटी पातळ विचित्र नागबंध ॥ शोभे नाभिमंडळ चौदा विद्यांचे भवन ॥ निर्मळ कसिला पीतांबर ॥ देवा कसिला पीतांबर ॥ ॥ वरी रत्‍न झळाळ ॥ जयदेवा. ॥३॥ मेखळा रत्नजडित जानु जंघा नागरा पोटऱ्या गुल्फ दोन्ही ॥ अंदुवाकी साजिऱ्या तोडरू रुळताती ॥ महाधाक असुरा पाउले काय वर्णू ॥ देवा पाउले काय वर्णूं ॥ तेजे लोपल्या तारा ॥ जयदेवा ॥४॥ योगिया ध्यानी गम्य सिंहासनी गणपती उभ्या चारी शक्ती ॥ सामवेद२ स्तविती घालिती विंजणवारे ॥ वरी चवऱ्या ढाळिती गोसावी योगियाच्या मोरया गोसावी योगियाच्या ॥ ध्यानीं मंगल मूर्ती ॥ जयदेवा धुंडिराजा ॥ जय मूषकध्वजा ॥५॥

१ दुंडीराजा २ सामवेश

मंगळवार

|| आरती मंगळवारची ||

चिंतामणी परिपूर्ण देवाधिदेव ॥ ब्रम्हांडी माया ही रचिली त्वां सर्व ॥ प्रपंच सुखदु:ख तुझें वैभव ॥ अखिल जन नेणती हा गुह्य भाव ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥ पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांती ॥ जयदेव ॥ध्रु०॥ निगमागम वर्णिता नकळेचि पारु ॥ भक्‍त जन कृपाळू हा मोरेश्‍वरू ॥ साधुपरिपालना धरीला अवतारू ॥ निर्विकल्प सेवा हा कल्पतरू ॥ जयदेव०॥२॥ शंकर जनक ऐसी पुराणे गाती ॥ परिसकळांचा जनिता हा मंगलमूर्ती ॥ अगाध याचा महिमा नकळे कल्पांती ॥ थोर पुण्य प्राप्ती सेवा ही मूर्ति ॥ जयदेव०॥३॥ निजभावें पूजन आरतियुक्‍त ॥ खिरापती नाना फळे अणिति भक्‍त ॥ एक आरति करिती पूजन नित्य ॥ निंद्क कपटीबुध्दि ठेकले बहुत ॥ जयदेव०॥४॥ मोरया गोसावी भक्‍त किंकर ॥ थोर भाग्य (पुण्य) माझें हा मोरेश्‍वर ॥ निंदक कपटी बुध्दि निणति हा पार ॥ गोसावी न म्हणावा हा मोरेश्‍वर ॥जयदेव०॥५॥ विरक्‍त साधुशील नेणति कुसरी ॥ महानुभावामध्ये अगाध ही थोरी ॥ सर्वांभूती भजन समावैखरी ॥ पाहति ही पाऊले धन्य संसारी ॥ जयदेव०॥६॥ भक्‍तराम म्हणे मोरेश्‍वरमूर्ति ॥ नित्यानंद शरण कल्याण कीर्ति ॥ तोडिसी मायाजाळ संसार भ्रांती ॥ अंत किती पाहसी नागाननव्यक्‍ती जयदेव ॥७॥

मंगळवार

आरती शेवट

(या आरतीचे वेळी श्रीमहाराज यांनी पंचारती ओवाळावयाची असते)

झाली पूजा उजळू आरती ॥ भक्‍तिभावें पूजा करु विघ्नेशी ॥ पूजेचा आरंभ करितो कुसरी ॥ कैसी पूजा तुझी न कळे अंतरी ॥ १ ॥ जयदेब जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥ भक्‍तिभावे तुझे चरण ह्रदयी ॥ जयदेव ॥ध्रु०॥ उजळिले दीप मनोमानसी ॥ सुखे निद्रा (मोरया) करी तू मंगलमूर्ती ॥ पूर्व पुण्य माया रचिली कुसरी ॥ भक्‍तिभावें तुज धरिले अंतरी ॥ जयदेव०॥ २ ॥ प्रपंचाची गती न कळे लौकिकी ॥ किती भोग भोगू विपरीत ध्याती ॥ म्हणुनी तुज शरण येतो (आलों) प्रतिमासी ॥ ऐसा भक्तिभाव निरोपी तुजसी ॥ जयदेव० ॥ ३ ॥ समर्थासी बोलणे नकळे मतीसी ॥ ऐसा सदोदित देखिला भक्‍तिसी ॥ मोरया गोसावी म्हणे तुजसी ॥ टाकिले वनवासी कणवाचे व्दारी ॥ जयदेव०॥ ४ ॥ अर्चन करूनि तुम्हा केली आरती ॥ सुखे निद्रा (मोरया) करी तू मंगलमूर्ती ॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥ भक्‍तिभावें तुझे चरण ह्रदयी ॥ जयदेव जयदेव ॥५॥

मंगळवार

॥ पद ६२ ॥

अहो कामधेनु गाय ॥ मोरया हो माय ॥ हुंबरोनी पाहे कैसी आलि ॥१॥ अहो कोंडा दारवंटा ॥ असो द्या वाड्यात ॥ ह्रदयामंदिरात माझे घरी ॥२॥ अहो सुकृत सामग्री ॥ असईल जरी ॥ मिळवण करी इस घाला ॥३॥ अहो पंचरसाची चरवी ॥ मन (चित्त) धरा हाती ॥ दोहा बरव्या रीती कामधेनु ॥४॥ अहो बैसे सावचित्त ॥ कांसे घाली हात ॥ नाही तरी लाथ देईल झणी ॥५॥ माझ्या भय वाटे मनासी ॥ हात घालू कैसी ॥ तिखट शिंगासी बोलूं नये ॥६॥ अहो धीर धरी नेटका ॥ मनची सांडी शंका ॥ पान्हा येईल१ मुखा ॥ पाहे आतां ॥७॥ अहो पान्हा जो दाटला ॥ झरारु सुटला ॥ तनुमन सोडा वत्स इचे ॥८॥ माझ्या बळीयाड मनीचे ॥ देह सत्व गुणाचे ॥ अमृत स्तन पितें ॥ त्यासी पावे ॥९॥ अहो पुरवील ठेवा ॥ बरवें आचरण ॥ कामधेनु तया घरी दुभे ॥१०॥ अहो मिस्किण गाऊली ॥ निजभक्ता माऊली ॥ अमृत वोळली आली येथें ॥११॥ अहो रोहेमोहे रस ॥ कुरवाळुनी हाते ॥ पान्हा जो गणनाथे घातलासे ॥१२॥ अहो ऐसी कामधेनु ॥ आहे चिंचवडी ॥ (अहो मोरेश्वरी) मोरया गोसावी दास तुझा ॥१३॥

मंगळवार

॥ पद ४२ ॥

स्वप्न देखिले नयनी हो रात्रिच्या पै वेळीं ॥ (महाराजा) विघ्नेश माऊली म्यां देखियेली ॥ १ ॥ बहुत पुण्याची बांधणी परी देखिली नयनी ॥ (महाराजा) आतां यासि मनी हो न विसंबे ॥२॥ पावे पावें तूं मोरया हो माझिया धांवण्या ॥ (महाराजा) तुजविण देवराया मज कोणी नाही ॥३॥ न विसंबे तुज हो देवा आपुलिया काजा ॥ (महाराजा) चरण तुझे ओज मी ध्यातों आहें ॥४॥ मयुरपुरीं वास त्वां केला गजानन ॥ (महाराजा) भक्तांच्या कामना तूं पुरविसीं ॥५॥ ज्या जैसी वासना हो तैसा तूं रे देसी ॥ (महाराजा) म्हणोनि चरणासी (पायासि) हो भजताती ॥६॥ क्षणक्षणा तुज ध्याती अवघा मंगलमूर्ति ॥ (महाराजा) तया देहगति हो नाही कदा ॥ ७ ॥ माझें वेधले हें मन हो लागले तुझें ध्यान ॥ (महाराजा) म्हणोनी शरण तुज आलों आहे ॥८॥ येई तूं उदारा हो गणराजा सुंदरा ॥ (महाराजा) ध्यान मोरेश्‍वरा मज लागलेंसे ॥९॥ रूप देखिलें सुंदर हो विघ्नेश मनोहर ॥ (महाराजा) तयासी म्यां वर हो मागितला ॥१०॥ प्रसन्न ज्या भक्ता तू होसी गणनाथा ॥ (महाराजा) त्यासी जन्मपंथ हो नाही कदा ॥११॥ मोरया गोसावी मज निधान लाधले ॥ (महाराजा) त्याचेने कृपेने तुज देखियेले ॥१२॥ तनुमन लागले हो तुझ्या हो चरणी ॥ (महाराजा) दास चिंतामणी तुज ध्यातों आहे ॥ १३ ॥

मंगळवार

॥ पद ४८ ॥

प्रथमारंभी ध्यातों गजानन देव ॥ त्यचेनें कृपेनें ध्यातो विश्वबीज ॥ तुज हो ध्याती अंबे त्रैलोकीचे देव ॥ तुझा हो रहिवास नकळे कवणा हो माये ॥ सकळासि प्रसन्न झाली जगदंबा ॥ गणराज म्हणे तूं येई हो अंबे ॥ सकळासि भाव तुझा आहे हो निकट ॥ भक्तिलागी पाव वेगीं म्हणतसे तुज ॥१॥ जय जय जय आनंद सकळ परिवार ॥ दैत्य वधून कैसे तारियेले जन ॥ भेटी देई सकळा जाई निजस्थाना ॥ध्रु.॥ प्रथम अवतार तुझा अकळू हो माये ॥ ब्रह्यादिक प्रार्थितीसी सदोदित अंबे ॥ देवाच्या वचनासी पावलीस वेगीं ॥ निराकार देह तुझा येई हो आकरा ॥२॥ आकारा न येसि तरी पाहवीस कोठें॥ प्रतिमेवेगळी तूं न कळसी कोठें ॥ अर्चन करुनि माता पावली सकळा ॥ रहिवास केला त्वां मार्कंडेय -वचना ॥३॥ अरण्यांत वास तुझा ऋषिवरी कृपा ॥ आनंदली जगदंबा वचन बोलती ॥ कासया परि तुम्ही आलेती हो ऋषी ॥ ऋषी बोलती माते दे आम्हा भक्ति ॥४॥ आणिक नवल थोर झाले हो अंबिके ॥ मोरया गोसावी म्हणे प्रार्थिले हो तुज ॥ पूर्वीच्या वचने करुनि भेटलीस मज ॥ धरिले चरण तुझे मोरेश्वरी आर्त ॥५॥ दीनानाथ कृपा करी दारिद्र्य हो नाशी ॥ अकळू जननी तुज वर्णू मी किती ॥ वर्णू जो लागलो तुज निराकार गोष्टी ॥ वरद - कृपेनें म्या देखिलीस दृष्टि ॥६॥ मज हो ठेविले कैसे न ये काकुलती ॥ कष्टाची गति कळली तुजसी ॥ मृत्युलोकीं ठेवियेले उपकारालागी ॥ देहधारी शरीर होतसे कष्टी ॥७॥ पापाच्या राशी देखतसे दृष्टी ॥ आणिक वचन एक ऐक हो माये ॥ विषयाचे गुण मज नाहीं कोठें ठाव ॥ काकुलती येतो अखंड ह्रदयीं ॥ ८॥ जय जय जगदंबे पुजेलागि यावें ॥ सकळ देऊन मज केले हो सरत ॥ त्रिकाळ रुप तुझे हृदयसंपुष्टी ॥ आरती करीन तुज सकळासारखी ॥९॥ मोरया गोसावी म्हणे मागू तुज काय ॥ सकळ परिपूर्ण मज आहे हो जगदंबे ॥ नवरात्र करितील नर नारी बाळे ॥ त्यांचे हो मनोरथ पुरवी लवकरी ॥१०॥ कष्टलिये शरीर लागलों चरणी ॥ मोरया गोसावी म्हणे आहे देहधारी ॥ शरिराची गती मज न कळे हो परी ॥ प्रपंच तोडी आतां न करी वेरझारा ॥११॥ मुळाविण यावे तरी अधोगती देहा ॥ सकळ मिळोनी मज मूळ पाठवावे ॥ सकळ परिवार मज न्याहो लवकरी ॥ उदंड बोलणे तरी समर्थासी काय ॥ १२ ॥ मायेच्या लक्षणे करुनि सांड नाही देहा ॥ झडकरि न येसी तरी प्राण गेला वाया ॥ करूणेचे शब्द ऐकिले देवे ॥ मजचि असतां तुज गांजिल कवण ॥१३॥ अखंड हृदयी आहे निरंतर जवळी ॥ प्रतिमासी दर्शन आहे मज जवळी ॥ सकळिका जनामध्ये ठेविले तुज बाळा ॥ माझिया वचनाचा नको करूं अनुभव१ ॥१४॥ मजचि कारणे तूं बा टाकिलें सकळिक ॥ अवघाचि अभिमान आहे तुझा मज ॥ उपकार मूर्ति केली तुजलागीं ॥१५॥ देवाच्या वचने मज सकळ परिपूर्ण ॥ नलगे अवसर हा सकळ देवा वंदी ॥ भक्तीच्या वचने गायिला गोंधळ ॥ पाहु जों लागलों तों एकचि मिळुनि ॥ उभयंता मिळुनि लागलों चरणी ॥१६॥ जय जय आ०॥

मंगळवार

॥ पद ४९ ॥

प्रथम हे अधिष्ठान वैकुंठ भुवन ॥ अहो रहिवास मूळपीठ ॥ भूमंडळासी येउनि ॥ अहो प्रकटली विश्वमाता ॥ नाम जगदंबा भवानी ॥१॥ अहो जोगवा विश्वरूप ॥ ब्रम्ह परिपूर्ण स्वरूप ॥ अहो नव दिवस पूर्ण झाले ॥ योगी हुंकार२ दिधले ॥ अहो चंडमुंडा विभांडोनी ॥ आसन धातले मूळपीठी ॥ अहो जोगवा० ॥२॥ अहो जोगावा घालि माये ॥ तुज हो मागतसे पाहे ॥ अहो देई हो भक्तिरस ॥ विनवी मोरया गोसावी ॥ अशनी ध्यानी शयनी हो ॥ स्मरे गणराज ह्रदयीं ॥३॥ आहे जोगवा० ॥
(पद क्र. ४८ व ४९ नवरात्रांत व दर मंगळवारी म्हणतात.)

मंगळवार

॥ पद ५० ॥

मयूरपुर गांवीं रहिवास धरिला ॥ थोर भाग्य याचे जन उध्दरिला ॥ तया ठायासी जा रे एक भावे ॥ देह अहंकार टाकुनिया धावे ॥१॥ येई येई तूं येई तूं येई मोरेश्वरा ॥ तुजविण नाही रे भक्ता साहाकारी ॥ ध्रु०॥ वाट वत्स जैसी धेनूची पाहाती ॥ तैसी आस तुझी लागली गणपती ॥ तनुमन धान लावा रे चरणी ॥ फुकासाठीं तुम्हा सांपडली झणी ॥२॥ सावध होऊनिया जावे तया ठायां ॥ मागील वासना टाका तुम्ही माया ॥ माया नको धरूं विषय - सुखाची ॥ तेणे हित काही नोव्हे तुमचे जाणा ॥३॥ अंतकाळी तुज न येती रे कामा ॥ शरण जाई एका मोरयाच्या नामा ॥ भवबंधन कोण चुकवील ॥ देहाअंती तुज कोण सोडवील ॥४॥ म्हणोनी धांवा धांवी करा संसाराची ॥ जोडी करा एका मोरयानामाची ॥ व्यर्थ म्हणशील तूं माझें माझे प्राण्या ॥ सर्वही टाकुनिया जाशील अज्ञाना ॥५॥ सकळिक राहतील आपुलाले ठायी ॥ तेथे तुज कोण सोडवीता आहे ॥ म्हणोनी धरा तुम्ही मोरयाची सोय ॥ हित काही तुम्ही विचारा रे देहीं ॥६॥ विनवी दास म्हणे चिंतामणी ॥ गर्भवासी देवा शिणलों मी बहु भारी ॥ चरणा (पाया) पासून तूं न करी मज दूरी ॥ म्हणोनी चरण तुझे धरिले दृढ भारी ॥७॥ येई०

मंगळवार

॥ लळीत ७ ॥

एक चित्त करुनि मना ॥ नित्य ध्यायी गजानना ॥ म्हणा नाम मोरयाचे ॥ सकळ कारण जन्माचे ॥ ध्रु. ॥ जे जे इच्छिसील मनी ॥ ते ते तुज देईल तत्‌क्षणी ॥ म्हणा नाम मोरयाचे ॥१॥ भुक्तिमुक्‍तीचे आरत ॥ ध्यारे मोरया दैवत ॥ म्हणा नाम मोरयाचे ॥ स० ॥ २ ॥ आणिक कष्ट नको करू ॥ नित्य ध्यारे विघ्नहरू ॥ म्हणा नाम मोरयाचे ॥ स० ॥ ३ ॥ येवढा महिमा ज्याचे पायी ॥ तो देव आम्हा जवळी आहे ॥ म्हणा नाम मोरयाचे ॥ स० ॥ ४ ॥ मोरया गोसावी विनटला ॥ तेणे उपदेश सांगितला ॥ म्हणा नाम मोरयाचे ॥ सकळ कारण जन्माचे ॥ ५ ॥

मंगळवार

॥ पद ५१ ॥

मोरेश्वर स्थळ तुझे आदिस्थानक ॥ तेथे भक्त येती तुज शरणागत ॥ तुझिया ठायासी येती कर्मदोषी ॥ कामना तयांच्या तूं बा पुरविसी ॥ १ ॥ नाम घेतां तुम्ही कां रे लाजताती ॥ नामासाठी तुम्हा होईल (स्वानंद) वैकुंठप्राप्ती ॥ ध्रु.॥ ध्याती देवा तुज मागती अपार ॥ कृपा करिसी देवा चुकविसी संसार ॥ स्मरण केलिया पापें दग्ध होती ॥ जडजीव उद्धरिले तूं बा गणपती ॥ २ ॥ ऐसें दैवत मी न देखे दुसरें ॥ नाम घेतां तया नलगेची पै येणें ॥ तारि तारि भक्ता तू रे गजानना ॥ एक वेळ लावी तू आपल्या चरणा ॥ ३ ॥ नवमास सोशिल्या गर्भीच्या यातना ॥ बाळपण गेलेंरे रुदन अज्ञाना ॥ तरूणपण बहर विषयाची वासना ॥ एक वेळ धावे रें पावे गजानना ॥ ४ ॥ व्यर्थ सर्पीण माया झोंबली अंतरीं ॥ तुजवीण कोण आहे विष बा उतरी ॥ इचिया विखारे नाडलों बहुत ॥ उतरी देवराया माझे तू त्वरित ॥ ५ ॥ इचिया लहरी जाळती शरीरी ॥ धाव पावे देवा यावे बा लवकरी ॥ आतां साहवेना उशीर न लावी ॥ दास चिंतामणी तुझी तुज विनवी ॥ ६ ॥ नाम घेतां.॥Marathi_text | by Dr. Radut