श्रीक्षेत्र मोरगाव येथील वार्षिक कार्यक्रम

मोरगाव येथील भाद्रपद शुद्ध चतुर्थी व माघ शुद्ध चतुर्थी (गणेशजयंती)

हे दोन्ही उत्सव बहुधा सारख्याच पद्धतीने साजरे होतात. द्वारयात्रा हा यात्रेतील प्रमुख कार्यक्रम असतो. प्रतिपदेपासून द्वारयात्रेला प्रारंभ होतो. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत रोज एक याप्रमाणे क्षेत्रागाराच्या सीमेवर असणारे धर्म, अर्थ, काम व मोक्ष याठिकाणी असलेल्या देवतांचे सोवळ्याने पूजन करावयाचे असते. चार दिवस उपवास करावयाचा व पंचमीस द्वारयात्रेची सांगता करावयाची. द्वारयात्रेच्या सांगतेप्रित्यर्थ श्रींची महापूजा अभिषेक, नैवेद्य, ब्राह्मण व सुवासिनीभोजन व यथाशक्ती अन्नसंतर्पण करायचे असते. ही द्वारयात्रा मुख्यतः भाद्रपद व माघ या दोन्ही यात्रा पायी करणे शक्य नसेल तर वाहनातून केली तरी चालते. तेही अशक्य असेल तर ब्राह्मणाकडून द्वारयात्रा केली तरी चालते. द्वारयात्रेचे फार महत्त्व सांगितले आहे.

यात्रेत प्रतिपदा ते तृतीया रोज सायंकाळी श्रींची अलंकार पूजा होते. त्यावेळी श्रींच्या जामदारखान्यातील सर्व सोनेमोती हिरेमाणकांचे जडावांचे निरनिराळे अलंकार व महावस्त्रे श्रींचे अंगावर घालतात. त्याला पोषाख म्हणले जाते. हा पोषाख प्रत्येक दिवशी वेगळा असतो. हे अलंकार राजेरजवाडे, संस्थानिक व अन्य श्रीमंतांनी वेळोवेळी श्रींना अर्पण केलेले आहेत. अलंकारपूजेनंतर श्रींची मूर्ती फारच प्रेक्षणीय दिसते. गणेश जयंतीला मात्र अलंकार पूजा नसते. प्रतिपदा ते चतुर्थी रोज संध्याकाळी श्रींपुढे कीर्तन होते. नंतर श्रींच्या उत्सवमूर्तीची पालखीतून मंदिराच्या प्रदक्षिणेच्या वाटेवरून वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघते. ती दोन तास चालते. त्याला छबिना म्हणतात. त्यावेळी मुले श्रींपुढे टिपऱ्यांचा खेळ खेळतात. काही भक्‍तमंडळी श्रींपुढे भजन करतात. श्रींपुढे चौघडा वाजवतात, दीपोत्सव करतात. अशारीतीने दोन तासापर्यंत छबिन्याचा कार्यक्रम चालतो. नंतर श्रींना नैवेद्य व मंत्रपुष्प होते त्यानंतर श्रीमोरया गोसावी यांनी रचलेल्या पदांचा मोठा कार्यक्रम होऊन पंचपदी होते. पंचपदी झाल्यावर श्रींच्या अंगावरील अलंकार व महावस्त्र उतरवून जामदारखान्यात नेऊन ठेवतात. नंतर शेजघरात श्रींचे शयन होते. असा हा यात्रेतील नित्य कार्यक्रम असतो.

या यात्रेतील प्रमुख कार्यक्रम म्हणजे चिंचवडहून श्रीमंगलमूर्तींची पालखी यात्रेसाठी मोरगावी येते. श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले होते आणि प्रसाद म्हणून गणेशाचा तांदळा त्यांना मिळाला होता. या तांदळ्याची त्यांनी चिंचवड येथे स्थापना केली व दर भाद्रपद व माघी वारीला हा तांदळा घेऊन श्रीमोरया गोसावी वारीला येत. तीच परंपरा आजही चालू आहे. भाद्रपद व माघ महिन्यातील यात्रेसाठी प्रतिपदेला भक्तगणांसह समारंभपूर्वक देव चिंचवडहून निघतात व पुणे, सासवड, जेजुरी या मार्गे ठराविक ठिकाणी मुक्‍काम करीत तृतीयेला रात्री मोरगावी येतात. यात्रेबरोबर श्रीमोरया गोसावींच्या वंशातील चिंचवड संस्थानच्या गादीवरील महाराज असतात. तेच या यात्रेचे प्रमुख असतात. इथले सर्व धार्मिक कार्यक्रम चिंचवड संस्थानच्या महाराज पट्टाधीकाऱ्यांच्या हस्ते होतात. सध्या श्री मंदार जगन्नाथ देव हे गादीवरील महाराज व संस्थानचे प्रमुख विश्वस्त आहेत.

चतुर्थीला सकाळी श्रीमंगलमूर्तीची स्वारी पालखीतून वाजतगाजत गणेशकुंडावर स्नानासाठी नेतात. याच गणेशकुंडात स्नानानंतर सूर्याला अर्घ्य देताना श्रीमोरया गोसावी यांना तांदळा प्राप्त झाला होता. पालखी बरोबर अनेक भक्‍तही स्नानास जातात. श्रीगणेशचतुर्थीस मध्यानकाळ हा श्रीगणेशजन्मकाळ आहे. त्यामुळे हा काळ पर्वकाळ मानला जातो. त्यावेळी चिंचवडचे श्रीदेव महाराज येथील श्रींची स्वतः महापूजा व ब्राह्मणद्वारा महाभिषेक करतात. नंतर येथील श्रीमयूरेश्वरापुढे चिंचवडच्या श्रीमंगलमूर्तीची स्वारी सिद्धिबुद्धिसहित ठेऊन दोन्ही मूर्तीची भेट होते व दोघांना महानैवेद्य समर्पण करण्यात येतो. दोन्ही मूर्तींचे एकत्रित दर्शन हा या यात्रेतील परमोच्च आनंदाचा क्षण होय. हा दर्शनाचा सोहळा फारच नयनमनोहर असतो. केवळ या दर्शनासाठी भक्त लांब लांबून यात्रेचा त्रास सहन करूनही येतात. दोन्ही मूर्तीचे एकत्र दर्शन घेतात व कृतार्थ होतात. नंतर श्रीमंगलमूर्ती परत स्वस्थानी ठेवतात. ब्राह्मणांना दक्षिणा देऊन अन्नसंतर्पण होते. त्याच दिवशी रात्री छबिना झाल्यावर श्रीनग्नभैरवाच्या मंडपात श्रींची पालखी नेऊन त्रिगुणात्मिका मायेबरोबर श्रीगणेशाचे मंगलाष्टकपूर्वक लग्न लावतात. नंतर रात्री श्रींना अभ्यंगस्नान घालून शेंदूर लेपन करतात. त्यावेळी त्या शेंदूरचर्चित रूपाकडे पाहून भक्त समाधिसुखात मग्न होतो. त्यानंतर चिंचवडचे श्रीदेव महाराज सर्व भक्‍तमंडळींसमवेत मंडपात श्रीमोरया गोसावींच्या पदांचे गायन करतात. हा कार्यक्रम अंदाजे तीन तास चालतो. ही पदे भक्तिरसाने ओथंबलेली व श्रवणीय असतात. खिरापत वाटल्यानंतर पदांचा कार्यक्रम संपतो.

पंचमीच्या दिवशी सकाळी मंदिरातील पश्चिमेकडील सोप्यातील मखरात श्रीमंगलमूर्तींची स्वारी अलंकारानी सजवून आरास करून मांडतात. श्रीमंगलमूर्तीपुढे पदांचा कार्यक्रम होतो. त्यात खेळया, बाळसंतोष, जोगवा इत्यादी पदे म्हणतात. त्यावेळी गुलाल उधळून टिपऱ्या खेळतात. या खेळात लहान, थोर सर्व भक्‍त मंडळी सामील होतात. हा कार्यक्रम हृद्य व प्रेक्षणीय असतो. माघ महिन्यात चतुर्थीच्या रात्री श्रींचे पुढील मोठ्या मंडपात श्रीमंगलमूर्तींची स्वारी मांडून पदांचे गायन करतात. यावेळी टिपऱ्या नसतात. हा कार्यक्रम संपल्यावर उत्सवाचा उत्तरार्ध सुरू होतो. श्रीमंगलमूर्तींची स्वारी मंदिराच्या खाली असलेल्या चिंचवड देवस्थानच्या वाड्‍यातील देवघरात आणतात. तेथे त्यांची पूजा व नैवेद्य होऊन बरेच अन्न संतर्पण होते. याशिवाय भाद्रपद आणि माघ पंचमीला पवळीत देवस्थान महाप्रसाद करत असते. भाद्रपद षष्ठीला देवळात महाप्रसाद असतो.

अशारीतीने तीन दिवसांचा उत्सव साजरा झाल्यावर, चिंचवडहून आलेली श्रीमंगलमूर्तींची स्वारी षष्ठीच्या दिवशी पूजा नैवेद्य करून चिंचवडास परत जाण्यासाठी निघते.

दसरा (विजयादशमी)

येथे विजयादशमीचा श्रीच्या सीमोल्लंघनाचा समारंभ फारच थाटात साजरा करतात. निरनिराळ्या प्रकारचे शोभेचे दारूकाम हे या समारंभाचे वैशिष्ट्य होय. दसऱ्याच्या दिवशी पहाटेसच तोफेची सलामी होते व सारा मोरगाव जागा होतो. पहाटे श्रीला अभ्यंगस्नान घालून षोडशोपचारे पूजा होते. नंतर वाद्यांच्या गजरात आरती होते. आरतीच्या वेळी सर्व लोक श्रींपुढे दारू उडवतात. श्रींपुढे पटांगणात ग्रामस्थांची सभा होते. त्यावेळी सर्वांना प्रसाद म्हणून गहू तांदूळ वगैरे शिधा वाटतात. त्यावेळी गावातील काही भांडणेतेटे, अडचणी किंवा तक्रारी असतील तर त्यावर चर्चा होऊन निर्णय दिले जातात व भांडणतंटे मिटविले जातात.

रात्री नऊच्या सुमारास श्रींची पालखी राजेशाही थाटात सीमोल्लंघनास व नगरप्रदक्षिणेस समारंभपूर्वक मंदिरातून निघते. पालखीबरोबर पताका, तोरणे, छ्त्र चामर अब्दागिरी चवरी, नगारखाना, दिवट्या, मशाली शोभेची दारू वगैरे सरंजाम असतो. रात्रभर दारू उडविण्याचे काम चालू असते. श्रीच्या दरवाजापुढील फरसावर पालखी आली की अनेक तोफांची सलामी होऊन पालखी खाली उतरते व बाजारपेठेतून सर्व सरंजामासह पवळीत शमीवृक्षाखाली येते. तेथे श्रींचा पोषाख उतरवून सर्व मौल्यवान्‌ वस्तू हक्कदार माणसाजवळ देतात. नंतर श्रींची पालखी खेळ खेळण्याकरता सिद्ध होते. तेथे पळापळी, हरमळ वगैरे खेळ खेळले जातात. नंतर तेथून जवळच असलेल्या फिरंगाई देवी जवळ पालखी येते. तेथे गोंधळी लोक गोंधळ म्हणतात. तेथून पालखी पूर्वेस श्रीबुद्धिदेवी व श्रीतुकाईदेवीजवळ येते. नंतर ती श्रीमध्यमेश्वर महादेवाच्या देवळापुढे येते. तेथे थोडावेळ थांबून तेथे असलेल्या श्रीहनुमान, श्रीभैरव, श्रीकालिकादेवी व श्रीमध्यमेश्वर या देवतांची आरती करतात. जवळच्या पटांगणात पालखी खेळ खेळण्यासाठी थोडावेळ थांबते. पहाटेच्या सुमारास पालखी दक्षिणेकडील सोनेश्वराच्या मंदिरात येते. तेथे आपट्याची (सोने) पूजा होऊन सर्व हक्कदारांना सोने वाटले जाते. नंतर येथील मुजुमदाराकडून हक्कदार, वतनदार, मानकरी वगैरे सर्वांची नावे परंपरागत मानाप्रमाणे वाचली जातात. त्यावेळी तोफांची सलामी होते. तेथून पालखी नदीच्या अलिकडील झाडीत येते. तेथे श्रींचे अंगावर पुनः पोषाख व अलंकार घातले जातात. व पालखी मंदिराकडे येण्यास निघते. सकाळी पालखी मंदिरात परतते. तेथे आरती धूपारती होऊन हा कार्यक्रम संपतो. हा समारंभ मोरगावात अतिशय महत्वाचा मानला जातो. या समारंभास ग्रामस्थ कितीही दूर असला अगर कितीही अडचणीत असला तरी तेथून तो आवर्जून येतो.