श्रीक्षेत्र मोरगाव परिसरातील स्थळे
श्रीक्षेत्र मोरगाव परिसरातील सात तीर्थे

मोरगाव इथे कऱ्हा नदीच्या पाच मैलांच्या प्रवाहात पुढील सात तीर्थे आहेत.
१) गणेशतीर्थ२) भीमतीर्थ
३) कपिलतीर्थ
४) व्यासतीर्थ
५) ऋषितीर्थ
६) सर्वपुण्यतीर्थ
७) श्रीगणेशगया तीर्थ
त्यापैकी श्रीगणेशतीर्थ म्हणजे श्रीगणेशाने आपल्या अंकुशाच्या आघाताने निर्माण केलेले श्रीगणेशकुंड होय. हे श्रींच्या मंदिरासमोर सुमारे १ - १॥ फर्लांगावर आहे. त्या कुंडाजवळ तीर्थराज गणेश आहे. त्याच्या पश्चिमेस पाच मैलांवर पांडेश्वर या गावी नदीच्या तीरावर असलेल्या श्रीपांडवेश्वरांच्या मंदिराजवळ श्रीगणेश गया तीर्थ आहे. सात पैकी ही दोनच तीर्थे आज उपलब्ध आहेत. पांडवेश्वर मंदिरातील महादेव फारच मोठा आहे. हे मंदिर पांडवकालीन आहे. श्रीमयूरेश्वरक्षेत्रांतर्गत श्रीगणेशगया विधानापैकी श्रीगणेशगया श्राद्ध येथे करतात. गाणपत्यांची मोरगाव ही काशी व पांडवेश्वर ही गया समजली जाते. तेथील मंदिराच्या आवारात गयाश्राद्ध करून, श्रीगणेश मूर्तीचे पूजन करून, त्याच्याजवळ असलेल्या अठरा गयागणेशपदावर अपल्या पितरांच्या उद्धाराकरता पितरांच्या नावे पिंडप्रदान करायचे असते. नंतर मंदिरातील अक्षय्य वटवृक्षाखाली वडाचे पूजन करून वटश्राद्ध करतात. त्यामुळे पितरांचा उद्धार होतो व त्यांना श्रीगणेशाचा स्वानंद लोक प्राप्त होतो.
पवळी

मोरगाव येथे कऱ्हा नदीच्या उत्तर तीरावरती चिंतामणीचे मंदिर आहे. त्या मंदिर परिसराला पवळी असे म्हणतात. या ठिकाणी मोरया गोसावींची आई सौ. पार्वतीबाई आणि वडील श्री. वामनभट्ट दोघेजण यात्रा करत करत इ. स. १३२४ मध्ये आले. येथे त्यांनी ४८ वर्षे तपश्चर्या केली. त्यांना श्रीमयूरेश्वर प्रसंन्न झाले. मयूरेश्वरांनी ’मी पुत्ररूपाने तुझ्या पोटी अवतार घेईन व जगाचा उद्धार करीन’ असा आशीर्वाद दिला. त्या प्रमाणे पुढे श्रीशालिवाहन शके १२९७, सन १३७५, माघ शुद्ध चतुर्थीला त्यांना मुलगा झाला. मुलाचे नाव ’मोरेश्वर’ ठेवले.
चाळीस वर्षापूर्वी भाद्रपद उत्सवात पंचमीला श्रीमंगलमूर्तीची पालखी पवळीमध्ये मुक्कामास असे. तेथे श्रीमंगलमूर्तींची पूजा नैवद्य होऊन बऱ्याच मोठ्या प्रमाणात अन्नसंतर्पण होत असे. त्यावेळी अन्नाचा प्रचंड ढीग मांडून ते अन्न सर्व जमातींचे लोक मोठ्या प्रमाणात श्रद्धेने प्रसाद म्हणून लुटून नेत असत.
सध्या भाद्रपद पंचमीला पवळीत चिंचवड देवस्थान महाप्रसाद करत असते. ही प्रथा अखंड चालू आहे.