श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी

कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव आहे. त्या गावी श्रीवामनभट्ट शाळिग्राम आणि त्यांची पत्‍नी पार्वतीबाई नांदत होते. देशस्थ ऋग्वेदी, हरितस गोत्राचे वैदिक असलेले, श्रीवामनभट्ट श्रुतिस्मृतिपुराणोक्‍त गृहस्थाश्रमाचे काटेकोर पालन करत होते. अर्धे अधिक आयुष्य लोटले तरी पुत्रसंतान नाही म्हणून उदास झालेले वामनभट्ट घर सोडून निघाले. पत्‍नी बरोबर मजल दर मजल प्रवास करत मोरगावला आले. कऱ्हेच्या पठारावर विराजमान झालेल्या श्रीमयुरेश्वराला पाहून त्यांचे चित्त विराले. मनोरथ पूर्ण होईल अशी त्यांना आशा वाटू लागली. पोटी पूत्र व्हावा म्हणून त्यांनी खडतर तपश्चर्या केली. शेवटी श्रीमयुरेश्वर प्रसन्न झाला आणि त्यांच्या पोटी अजन्मा जन्माला आला. पुढे आठव्या वर्षी उपनयन झाले. वेदाध्ययन संपले. श्रीमयुरेश्वराच्या भेटीसाठी तळमळणाऱ्या मोरयाला योगिराज नयनभारती गोसावी भेटले. त्यांच्या उपदेशाने मोरयाने मुळामुठेच्या काठी थेऊरच्या जंगलात चिंतामणीची घोर तपश्चर्या केली. बेचाळीस दिवसांच्या कठोर अनुष्ठानाने श्रीचिंतामणी प्रसन्न झाला. मोरया गोसावी बनले. ’गो’ म्हणजे इंद्रिये, त्यांच्या स्वाधीन झाली. मन श्रीमयुरेश्वरात रमले. शमदम संपन्न गोसावी अष्टसिद्धी प्राप्त करून मोरगावला आले. त्यांच्या सिद्धी गोरगरिबांच्या, दीन दुबळ्यांच्या संकट निवारणासाठी राबू लागल्या. ’बहुत जनासि आधारू’ झालेल्या त्यांच्या पायाशी येऊन लोक कृतकृत्य हो‍ऊ लागले. मोरया गोसावींचा सगळीकडे मोठा बोलबाला झाला. पण यात जनाची उपाधि वाढली. ध्यानधारणेला वेळ मिळेना. एक दिवस अचानक मोरगाव सोडून मोरया गोसावी चिंचवड जवळच्या किवजाईच्या जंगलात आले. एकांतात ध्यानधारणा करू लागले. पण नियती काही वेगळीच होती. चिंचवडकरांनी त्यांना गावात आणले. आजचा वाडा आहे त्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधून दिली. त्यात राहून मोरया गोसावी सेवा करू लागले.

प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत व मजल दर मजल करत मोरगावला जात. चतुर्थीला श्रीमयुरेश्वराची पूजा करत. पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत. एकदा कऱ्हेला पूर चढला. पाण्याला जबर ओढ होती. एका कोळ्याच्या पोराचे रूप घेऊन श्रीमयुरेश्वर आला. मोरया गोसाव्यांना त्याने कऱ्हेपार केले. एकदा उशीर झाला. देऊळ बंद करून गुरव घरी गेले. मोरया गोसावींची पूजा अंतरायची पाळी आली. मोरया गोसावी तरटीपाशी बसून मोरयाला आळवू लागले. तर प्रत्यक्ष श्रीमयुरेश्वर त्यांच्या साठी बाहेर आला. एकदा असाच उशीर झाला तर कुलुपे गळून पडली. मोरया गोसाव्यांनी श्रीमयुरेश्वराची यथासांग पूजा केली.

हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला. अन्नदानाला ते फार महत्व देत. अन्नसत्र, सदावर्त, यात्रा, उत्सव, पूजा-अर्चा यामुळे चिंचवड सदाच गजबजू लागले. मंगलमूर्ती मोरयाचा घोष करत, मोरयाचा धर्म वाढवत सन १५६१ मार्गशीर्ष वद्य षष्ठी या दिवशी चिंचवडला पवनेच्या काठी त्यांनी समाधी घेतली. पवनेचा काठ पवित्र झाला. दर्शनासाठी भक्‍तांची पावले चिंचवड कडे वळू लागली.

श्रीमोरया गोसावी यांची संजीवन समाधी :

त्या काळी मोरया गोसावींचे माहात्म्य खूप वाढले होते. अनेक प्रकारचे लोक दर्शनाला येत. जनसंपर्कामुळे तपश्चर्येत व्यत्यय येत होता. त्यांनी श्रीमयुरेश्वराचा धावा केला. त्या क्षणीच श्रीमयुरेश्वराने प्रगटून विचारले, "बोल तुझी काय इच्छा आहे?" मोरया गोसावी म्हणाले,श्रीमयूरेश्वरा, मला आता गुप्तवास करण्याची, समाधी घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला अखंड अद्वैत अवस्था भोगता येईल."श्रीमयूरेश्वर म्हणाले "अरे तू आणि मी वेगळे नाहीत. आपण एकच आहोत. मी अखंड तुझ्या हृदयात निवास करीन, तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडतील." असा आशीर्वाद देऊन श्रीमयूरेश्वर अंतर्धान पावले.

गेली काही वर्षे मोरया गोसावी देहीच विदेही अवस्था भोगत होते. ते अखंड आत्मानंदात रमलेले असत. समाधानाने व तृप्तीने त्यांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला विचार आपल्या मुलाला चिंतामणीला सांगितला. त्यांना अतिशय दुःख झाले. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे पवना नदीच्या काठावर एक पवित्र भूमी पाहून त्या ठिकाणी समाधीसाठी गुंफा तयार केली.

मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १४८३, साल १५६१ हा उत्तम दिवस पाहून श्रीमोरया गोसावी घरून निघाले. देवळी आले. त्यांच्या बरोबर श्रीचिंतामणी महाराज, दोन सुना, नातवंडं असा परिवार होता. गावातले अनेक लोक आधीच घाटावर येऊन बसले होते. सगळीकडे मोरया नामाचा गजर चालू होता. मोरया गोसावींनी स्नान केले. पूजा केली. धौतवस्त्र परिधान केले. मोरया गोसावी गुंफेत उतरले. एक-दीड परस खोलीची गुंफा होती. दहा हात लांब, दहा हात रुंद चिरेबंदी पाषाणांनी बांधून काढलेली. मधोमध पाषाणाचा चौरंग, त्यावर आसन, पुढे आणखी एक चौरंग, त्यावर गणेशपुराण, दोन्ही बाजूला दोन समया तेवत होत्या. मोरया गोसावी आसनावर बसले. चिंतामणी महाराजांनी त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला. सुनांनी औक्षण केले. सगळेजण पाया पडत होते. बघता बघता मोरयांची समाधी लागली. नजर दोन भुवयात स्थिरावली. शरीर ताठ झाले. प्राण ब्रह्मरंध्रात येऊन राहिले. चित्त चैतन्याकार करुन ते आत्मानंदात निमग्न झाले.

चिंतामणी बाहेर आले. एक प्रचंड शिळा उचलून त्यांनी गुंफेवर ठेवली. चितामणी महाराजांनी समाधीवर सिद्धिबुद्धिसहित मोरयाची मूर्ती बसविली. समाधीकडे जायचा रस्ता होता, त्यावर अर्जुनेश्वराची मोठी शाळुंका स्थापन केली. हे समाधिस्थान जागृत आहे. आजही अनेक भक्‍तांना साक्षात्कार होतो. प्रचीती येते.