श्रीक्षेत्र सिद्धटेक येथील वार्षिक कार्यक्रम

गणेश जयंती (गणेश जन्म)

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी या काळात गणेश जयंतीचा (गणेश जन्म) उत्सव असतो.

उत्सवातला नैवेद्य:

पहिले तीन दिवस नेहमीप्रमाणे नैवेद्य असतो. चतुर्थीला पाच पक्वान्नांचा महानैवेद्य असतो.

उत्सवातले दैनंदिन कार्यक्रम:

उत्सवात दुपारच्या पूजेपर्यंत म्हणजे १२ वाजेपर्यंतचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतात.

प्रतिपदा ते तृतीया संध्याकाळची पूजा ६ वाजता होते. या वेळेस देवास पोषाख घातला जातो. भोगमूर्तीस (पालखीतली मूर्ती) पोशाख घातला जातो. या दिवशी ७:३० ला नैवेद्य होतो.
रात्री ८ वाजता पालखी प्रस्थान करते (निघते). मंदिरात परत येण्यास रात्रीचे ९ वाजतात.

चतुर्थीस सकाळी ८ वाजता पूजा झाल्यावर ९ वाजेपर्यंत येणाऱ्या भाविकांचे अभिषेक होतात. त्यानंतर ९:३० ते १०:३० महापूजा होते. पुढे १०:३० ते १२:०० महापूजा होते. ही महापूजा करण्याचा सिद्धटेककर महाराज देव - जहागीरदार यांचा वंशपरंपरागत मान आहे. महानैवेद्य होतो. त्या नंतर १२ ते १ वाजे पर्यंत गणेश जयंती व गणेश जन्माचे कीर्तन होते.

या दिवशी संध्याकाळी ५ वाजता श्रीसिद्धिविनायकांची पालखी निघते. पालखी पुढे विविध खेळ होतात. घराघरांसमोर पालखीतल्या देवतांना औक्षण होते. पालखी मंदिरात आल्यानंतर श्री महाराजांची कापूर आरती होऊन पालखी सोहळ्याची सांगता होते. नंतर सर्व मानकऱ्यांना महाराजांच्या घरी चहा पाणी होऊन कार्यक्रमाची सांगता होते.

या दिवशी रात्री १० वाजता श्री सिद्धिविनायकाची सर्व अलंकारासह पोषाख घालून पूजा होते. रात्री १२ वाजता आरती होते. पहाटे २:३० वाजता मोरया गोसावी कृत २१ पदांच्या महाआरतीस सुरूवात होऊन सकाळी ६ ते ६:३० पर्यंत ही आरती चालते.

पंचमीस महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होते.

वर्षभर प्रत्येक सणात श्री सिद्धिविनायकांना संध्याकाळी सालंकृत (अलंकार) पूजा असते. प्रत्येक सणाला देवांना रात्री ८ वाजता पोषाख असतो.

पूर्ण सोमवती अमावस्या असेल तर श्रीसिद्धिविनायक देव पालखीने स्नानाला भीमा नदीवर जातात.

उत्सवातील पदाचे गायन आणि त्यांचा क्रम पद्धती:

प्रतिपदेला पहिली ५ पदे होतात. दुसऱ्या दिवशी ७ पदे होतात. तिसऱ्या दिवशी ११ पदे होतात. त्या नंतर शेजारती होऊन मंदिर बंद होते. साधारण रात्री १२ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो.